यामुळे चिनी मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत यापुढे दिसणार नाही आमिर खान आणि सारा अली खान


लडाख येथील सीमेवर भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्या आता आपल्या ‘मार्केटिंग स्ट्रॅटजी’मध्ये बदल करताना दिसत आहेत. पुढील काही महिने आपल्या जाहिरातींमध्ये आघाडीची चिनी मोबाइल कंपनी व्हिवोने आपले ब्रँड अँबेसेडर अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री सारा अली खान यांना न दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या इव्हेंटपासूनही दोन्ही कलाकार दूर राहतील असे वृत्त आहे. चिनी ब्रँड्सचा प्रचार भारतीय कलाकारांनी करु नये अशी मागणी होत असताना हा निर्णय व्हिवोने घेतला आहे.

यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार इंडियन प्रीमियर लीग (IPL) टी-20 ची व्हिवो कंपनी प्रायोजक आहे. आगामी आयपीएल स्पर्धेवेळी कंपनी नवीन फोनचे प्रमोशन करेल, पण आमिर किंवा साराला प्रमोशनसाठी किंवा जाहिरातीत दाखवले जाणार नाही, असे याप्रकरणा बाबत माहिती असलेल्या एका इंडस्ट्री एक्झिक्युटिव्हने सांगितले. तर, खूप मोठं कारण असल्याशिवाय करार संपवता येत नसल्यामुळे ब्रँड अँबेसेडर म्हणून ते कायम राहतील. पण काही काळासाठी जाहिरातींमध्ये त्यांना दाखवणे कमी केले जाऊ शकते. सेलिब्रिटींना ग्राहकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांपासून दूर ठेवण्यासाठी असे करण्यात आल्याचे टॅलेंट मॅनेजमेंट फर्म Alchemist मार्केटिंग अँड टॅलेंट सॉल्युशन’चे व्यवस्थापकीय संचालक मनिष पोरवाल म्हणाले. पण, अद्याप व्हिवो कंपनीकडून अधिकृतपणे याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सध्या कंपनीच्या होम पेजवरुनही व्हिवोच्या ट्विटर हँडलवर नेहमी दिसणारा आमिर खान गायब आहे.