पुढच्या सोमवारी यूजीसी मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात यूजीसीने विद्यापीठ परीक्षांबाबत जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देण्यात आले होते. आता पुढच्या सोमवारपर्यंत यासंदर्भातील याचिकांवरची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात उत्तर देण्यासाठी यूजीसीला ३ दिवसांचा अवधी देण्यात आल्यामुळे पुढील सोमवारपर्यंत ही सुनावणी टळली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी युवासेनेने देखील याचिका दाखल केली होती.

देशावर ओढावलेल्या कोरोना संकटादरम्यान विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अनेक राज्यांनी घेतल्यानंतर ६ जुलै रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. या नव्या सूचनांमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात एका केंद्र शासित प्रदेशासह १३ राज्यातील विद्यार्थ्यांनी या नव्या सूचना रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यात महाराष्ट्रातून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली युवा सेनेनेही युजीसीच्या आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आज सुनावणी होणार होती. पण ती आता पुढील सोमवारपर्यंत ढकलण्यात आली आहे.