‘संबंध बिघडेल असे भारताने काही करू नये’, राम मंदिरावर बांगलादेशने दिली प्रतिक्रिया

काही दिवसातच अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता बांगलादेशने प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दूल मोमेन म्हणाले की, भारत सरकार आणि भारत समाजाने असे कोणतेही पाऊल उचलू नये ज्यामुळे बांगलादेशसोबत त्यांच्या ऐतिहासिक संबंधांवर परिणाम होईल. बांगलादेश मीडियामध्ये म्हटले जात आहे की, 5 ऑगस्टला भूमीपूजन झाल्याने तेथील कट्टरपंथी आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधकांना राजकीय संधी मिळेल.

मोमेन म्हणाले की, भारत-बांगलादेशमध्ये ऐतिहासिक संबंध आहेत. आम्ही मंदिराच्या निर्माणामुळे संबंधांना नुकसान पोहचू देणार नाही. मी भारताला आवाहन करतो की अशी कोणतीही अनुचित घटना होऊ देऊ नये, ज्यामुळे आपल्या मैत्रीला नुकसान पोहचेल. ही गोष्ट दोन्ही देशांवर लागू होते आणि दोन्ही पक्षांनी याप्रकारे काम करायला हवे की कोणत्याही प्रकारचा अडथळा टाळता येईल.

ते म्हणाले की, भारत आणि बांगलादेशच्या प्रत्येकाने संबंध मजबूत करण्यासाठी सकारात्मक भूमिका निभवावी. भारतीय समाजाची देखील जबाबदारी आहे की त्यांनी आमच्यासोबत संबंध चांगले ठेवावेत. सरकार अशा प्रकरणात सर्वकाही नाही करू शकत. लोक व मीडिया देखील एखाद्या देशासोबत संबंध चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

बांगलादेशच्या काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भलेही राम मंदिराची निर्मिती भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. मात्र तरीही बांगलादेशच्या नागरिकांवर याचा भावनात्मक परिणाम होईल. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि शेख हसीना यांच्यात झालेल्या फोनवरील चर्चेविषयी मोमेन म्हणाले की, ही चर्चा केवळ एक शिष्टता होती. बांगलादेशला क्षेत्रीय शांतता हवी आहे व सर्व देशांसोबत संवाद स्थापित करायचा आहे.