रात्री 12 वाजता अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा


मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 60वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्वच स्तरांतून मुख्यमंत्र्यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यातच आपल्या अनोख्या अंदाजात सूचक फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मध्यरात्री बारा वाजताच मुख्यमंत्र्यांबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे आणि अजित पवार फोटोत एकाच इलेक्ट्रीक वाहनामध्ये बसलेले दिसत आहेत. पण यातली सूचक गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती असले, तरी फोटोत मात्र गाडीचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती दिसत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसेच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे, अशा शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या आहेत.

दरम्यान संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात तीन चाकी सरकार असले तरी या सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या सरकारला विरोधक तीन चाकी, तीन चाकी म्हणून संबोधत आहेत, पण ही तीन चाके चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला

अर्थात सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात, असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या मुलाखतीतील वक्तव्य आणि आज मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी वाहनाचे स्टेअरिंग आपल्या हाती असलेला फोटो शेअर करणे हे राज्याच्या राजकारणात खूप काही सूचित करत असल्याचे बोलले जात आहे.