त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी ट्रॅक्टर पाठवणार सोनू सूद - Majha Paper

त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी ट्रॅक्टर पाठवणार सोनू सूद


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील 70 टक्के जनता ही लॉकडाऊनमुळे आपल्या घरातच आहे. पण याच दरम्यान समाजसेवेचे व्रत घेतलेल्या अभिनेता सोनू सूदचे काम सुरुच आहे. तो सध्याच्या घडीतही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या मदतीसाठी धावत आहे. त्यामुळेच बॉलीवुडचा हा खलनायक खऱ्याखुऱ्या आयुष्यात हिरो ठरत आहे. आतापर्यंत हजारो लोकांची सोनू सूदने मदत केली आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही सोनू सूद पुढे सरसावला आहे.

एका गरीब शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला सोनू सूदने तात्काळ मदतीचे आश्वासन दिले. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा आंधप्रदेशमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये एक शेतकरी बैल नसल्यामुळे आपल्या 2 मुलींच्या साहाय्याने नांगरणी करत आहे. बैलांसाठी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याच्या मुली स्वत:च नांगरणी करु लागल्या. या शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी सोनू सूद तात्काळ सरसावला.

याबाबत ट्विट करत सोनू सूदने म्हटले की, आता या शेतात 2 बैल नांगरणी करतील. 2 बैल उद्या सकाळीपर्यंत या शेतात नांगरणी करतील. शेतकरी आपल्या देशाचा गौरव आहे. या मुलींना शिक्षण पूर्ण करु द्या. पण नंतर काहीवेळाने सोनू सूदने पुन्हा ट्विट करत बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर पाठवण्याचा निर्णय घेतला. सोनू सूदचे एवढे मोठे मन पाहून अनेकांनी त्याच्या या कामाचे कौतुक केले आहे.