हुकूमशहा किम जोंगच्या उत्तर कोरियात आढळला पहिला कोरोनाबाधित


प्योंगप्यांग – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना या जीवघेण्या व्हायरसने अक्षरशः थैमान घातलेले असतानाच उत्तर कोरियाने आपल्या देशात एकही कोरोनाबाधित नसल्याचे म्हटले होते. पण आता तब्बल आठ महिन्यानंतर उत्तर कोरियांमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन याने देशात आणीबाणी लागू केली आहे. सीमेलगतच्या केसोंग भागात किम जोंग याने लॉकडाउन जाहीर केला आहे. संशयित कोरोनाबाधित रुग्ण हा अवैधपणे सीमा ओलांडून आला असल्याची माहिती समोर आली आहे. तीन वर्षांपूर्वी ही व्यक्ती दक्षिण कोरियात गेली होती. त्यानंतर अवैधपणे सीमा ओलांडून पुन्हा एकदा उत्तर कोरियात प्रवेश केल्याचे वृत्त उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

अधिकृतपणे या रूग्णाला कोरोनाबाधित जाहीर करण्यात आले नसल्याचे समजते. या रुग्णाला जर कोरोनाची बाधा झाली असेल तर तो उत्तर कोरियातील पहिला कोरोनाबाधित ठरणार आहे. या रुग्णाची कोरोना चाचणी झाली की नाही याबाबतची माहिती स्थानिक वृत्तमाध्यमांनी दिली नाही. पण, त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, एकही कोरोनाबाधित नसल्याचा सातत्याने दावा उत्तर कोरियाने केला होता. पण कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार, नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे, त्याचबरोबर मास्क घालणे आणि सीमा भागात काम करत असलेल्यांचे विलगीकरण करण्याचे आदेश किम जोंग सरकारने दिले आहेत.