ए. आर. रहमान यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया


बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाहीचा प्रश्न अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा जोर पकडू लागला आहे. त्यातच आपल्याला बॉलीवूडमध्ये आलेले अनुभव काहींनी सांगितले तर बॉलिवूड सोडण्यामागचे कारण काहींनी सांगितले. याच दरम्यान ऑस्कर विजेते दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान यांनी देखील काल एक धक्कादायक खुलासा केला. आपल्या विरोधात एक गट इंडस्ट्रीमध्ये अफवा पसरवत असल्याचा सणसणीत आरोप रहमान यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री कंगना राणावतने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत कंगनाने नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यात ती म्हणते की, इंडस्ट्रीमध्ये हा अनुभव प्रत्येकाला येतो. खासकरुन जेव्हा तुम्ही एकटे आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून राहण्याचा प्रयत्न करता, असे तिने म्हटले आहे. अनेकांनी तिच्या या ट्विटला पाठींबा दिला आहे.

रहमान यांना एका मुलाखतीदरम्यान हल्ली तुम्ही कमी चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शन का करता असा सवाल विचारण्यात आला होता. यावर त्यांनी खळबळजनक उत्तर दिले. चांगले चित्रपट मी कधीच नाकारत नाही. पण इंडस्ट्रीमध्ये असा एक गट आहे, जो काही गैरसमजांमुळे माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे. माझ्याकडे मुकेश छाब्रा हे आले होते आणि मी दोन दिवसांमध्ये त्यांना गाणी तयार करून दिली, असे त्यांनी म्हटले.

मला छाब्रा यांनी सांगितले की माझ्याकडे जाऊ नका असे अनेकांनी त्यांना म्हटले. तसेच माझ्याविरोधातही त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या गोष्टी ऐकून मला समजले की मला सध्या काम का मिळत नाही आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीत, असे रहमान पुढे म्हणाले.