बंगळुरूमधील ३,३०० कोरोनाबाधितांचा थांगपत्ताच नाही


बंगळुरु – कर्नाटकात आणि खास करून बंगळुरूमध्ये कोरोनाबाधितांची संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता तेथील प्रशासनाला नवा ताप झाला आहे. कारण बंगळुरुमधील ३ हजार ३३८ रुग्णांचा काही थांगपत्ता लागत नाही आहे. त्याचबरोबर त्यांना शोधणे हे आता जिकरीचे काम झाले आहे. कारण त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे.

थांगपत्ता लागत नसलेले ३ हजार ३३८ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. पण त्यांचा मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात येत असल्याचे बंगळुरू महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. इंडिया टुडे टीव्हीला बंगळुरू महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या कोरोना रुग्णांनी टेस्टवेळी योग्य पत्ताच दिला नसल्यामुळे पॉझिटिव्ह आढळूनही त्यांना शोधण्यात अडचण येत आहे. महापालिका आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी स्पष्ट केले की, शहरात ३ हजार ३३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कुठेही पत्ता लागत (untraceable) नाही. त्यांनी फॉर्म भरला होता. पण त्यावर घराचा पत्ता आणि फोन नंबर चुकीचा लिहिला. तेच पोर्टलवर आले आहे. धक्कादायक बाब अशी की कर्नाटकातील बाधित रूग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण हे बंगळुरू शहरातीलच असून कर्नाटकात काल एकाच दिवसात ५ हजारांहून अधिक रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातील २ हजार हे केवळ बंगळुरू शहरातील होते.