कोरोनाला पळवण्यासाठी पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सूचवला उपाय - Majha Paper

कोरोनाला पळवण्यासाठी पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सूचवला उपाय


नवी दिल्ली – संपूर्ण जग जीवघेण्या कोरोना व्हायरससमोर एकप्रकारे हतबल झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच जगासह आपल्या देशातील कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस वाढती संख्या चिंतेचा विषय बनता आहे. त्याचबरोबर देशात गेल्या काही दिवसांपासून आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही प्रचंड मोठी वाढ झाली असल्यामुळे देशातील प्रत्येकाचे लक्ष कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार याच्याकडे लागले आहे. असे असताना भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोरोना दूर पळवण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचवला आहे.

कोरोनामुळे प्रत्येकाच्या मनात दहशत व्याप्त आहे. सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच विविध उपाययोजना देखील राबवल्या जात आहेत. अशात भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करून कोरोनाला दूर पळवण्याचा उपाय सूचवला आहे.

कोरोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचे पठण करावे. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा, असे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तत्पूर्वी असाच उपाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सूचवला होता. त्याचबरोबर भारतीय परंपरा सखोलपणे समजून घेण्याची गरज आहे. योगामध्ये अनेक गोष्टी आहेत.मानसिक आणि शारीरिक आजाराविरोधात जग लढा देत आहे. पण, योगाच्या साहाय्याने आपण रक्तदाब, ह्रदयविकार, मूत्रपिंड यकृत आणि अगदी कोरोना व्हायरससारख्या आजारांवरही उपचार केले जाऊ शकतात, असे योगी आदित्यानाथ म्हणाले होते.