राज्यात तीन चाकी सरकार असले तरी या सरकारचे स्टिअरिंग माझ्याच हातात


मुंबई : विरोधीपक्ष भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून सातत्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीनचाकी सरकार असल्याचा आरोप केला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत आपले स्पष्ट मत मांडले आहे. राज्यात जरी तीन चाकी सरकार असले तरी या सरकारचे स्टिअरिंग माझ्याच हातात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राऊत यांनी हे तीन चाकी सरकार असल्याचे म्हणतात, असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, हे तीन चाकी सरकार आहे, पण ते गरीबांचे वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. मी मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असा समज कुणी करून घेऊ नये. माझे मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको असेच आहे. या सरकारला तीन चाकी, तीन चाकी म्हणून म्हणून संबोधले जात आहे, पण ही तीन चाके चालत आहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखत आहे. केंद्रात किती चाके आहेत. आमचे तर हे तीन पक्षांचे सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचे सरकार आहे. सांगा ना, मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाके होती. म्हणजे रेल्वेगाडीच होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादीला सरकारमध्ये झुकते माप दिले जात असल्याच्या यासंदर्भात राऊत यांनी प्रश्न केला असता मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, असा प्रेमळ आक्षेप सुरुवातीला त्यांचा (काँग्रेसचा) होता. पण मी भेटल्यानंतर तो गैरसमज दूर झालेला आहे. तो आक्षेप अगदी तीव्र नव्हता. सगळेजण निवडणुका लढवून निवडून येत असतात. जनतेच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात. आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, असे जर कुणाला वाटत असेल तर त्यात चूक आहे अशातला भाग नसल्याचे ठाकरे म्हणाले. अशा अपेक्षा व्यक्त करणे गुन्हा नाही. सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात असेलही पण माझ्याशी कुणी असे ठामपणाने बोलले नाही की, तुम्ही आम्हाला विचारत नाहीत. माझा पवारसाहेबांशी पण चांगला संवाद आहे. अगदी नित्यनेमाने नाही पण मी कधीतरी सोनियाजींना देखील फोन करत असतो, असे ते म्हणाले.

काल काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे