‘मी कधीच म्हणणार नाही लॉकडाऊन उठवतोय; पण…’, पहा उद्धव ठाकरेंची अनलॉक मुलाखत

सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनलॉक मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. सोबतच विरोधकांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. लॉकडाऊनविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ आपल्यालाच पुन्हा लॉकडाउन करावे लागले नसून लॉकडाउन करताना जनतेच्या आरोग्याचा तसेच अर्थव्यवस्थेचा एकाच वेळी विचार करणेही गरजेचे असते.

अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ का येते ?, असा प्रश्न राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की परत परत शहर लॉकडाउन करण्याची वेळ आपल्यावरच आलेली नाही. हे जागतिक कटू सत्य आहे की या विषयावर नेमकेपणे सल्ला देणारे आणि बोलणारे जगामध्ये कोणीच नाही. काहीजण दार उघड म्हणून टाहो फोडत आहेत त्यांना इतकेच सांगेन की दार उघडायला हरकत नाही; पण दार उघडल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का? मी असे कधीच म्हणणार नाही की लॉकडाउन मी उठवतोय. नाही मी अजिबात असे म्हणणार नाही. पण मी हळूहळू एक एक गोष्टी उघड्या करत चाललो आहे.

सौजन्य – सामना

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्न विचारला असता,  उद्धव ठाकरे म्हणाले, तिथली करोनाची परिस्थिती बघत होते ते. त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात, असा खोचक टोला लगावला.

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात मुख्यमंत्री मंत्रालया गेले नाहीत, त्यांनी दौरे केले नाहीत, अशी टीका विरोधक सातत्याने करत असतात. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या मदतीने काम सुरू आहे. मंत्रालय आता बंद आहे. आज तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे. तुम्ही त्याचा योग्य वापर करु शकत नसाल तर तुमच्यासारखे दुर्भाग्य असणारे तुम्हीच आहात. आता मुलाखत झाल्यानंतर घरी जाऊन मी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. हे रोजचे चालले आहे. विदर्भातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मी काल व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन घेतली. परवा तिन्ही पक्षांच्या आमदारांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. म्हणजे एका वेळेस घरात बसून मी सगळीकडे जाऊ शकतो. मी पूर्ण राज्य कव्हर करतोय आणि निर्णय घेतो आहे.