ठाकरे सरकारचा कोकणातील माणसांशी दुजाभाव का?; आशिष शेलारांचा सवाल - Majha Paper

ठाकरे सरकारचा कोकणातील माणसांशी दुजाभाव का?; आशिष शेलारांचा सवाल


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे सर्वधर्मीयांच्या सणांवर विरजण पडले असून, त्यातच काही दिवसांवर येऊन ठेपलेला आणि दरवर्षी हर्षोल्हासात साजरा होणारा गणेशोत्सवही या दुष्ट संकटामुळे नियमांच्या चौकटीत राहुनच साजरा करावा लागणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेत गणेशोत्सवासाठी सरकारकडून नियमावली जारी केली आहे. तर चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे वेध लागलेले असतानाच यासंदर्भात राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईवर भाजपने टीका केली आहे.

यासंदर्भात राज्यातील ठाकरे सरकारला भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सवाल केला आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये गरम पाणी, शौचालये, औषधांसाठी ग्रामपंचायतीना ना विशेष निधी दिला. ना गणेशोत्सवाबाबत वेळीच निर्णय जाहीर केला. गणेशोत्सवासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री विशेष गाड्या सोडायला तयार आहे, पण राज्य सरकारची मागणीच नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि चाकरमान्यांमधील दरी वाढत आहे. हे ठाकरे सरकार आमच्या कोकणी माणसांशी असा दुजाभाव का करत आहे?, असे शेलार यांनी म्हटले आहे.

कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागील आठवड्यातच बसेस आणि रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली होती. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे मुंबईतून जायला रेल्वे सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. परंतु, आंतरजिल्हा प्रवासावर राज्य शासनाने बंदी घातलेली असल्यामुळे रेल्वेने महाराष्ट्र राज्यांतर्गत आरक्षण दिलेले नाही व गणपती विशेष गाड्या देखील अद्याप सोडलेल्या नाहीत. तसेच, राज्य परिवहन सेवादेखील बंद असल्याने नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे. तरी, आपण संबंधितांना सूचना देऊन मध्य व पश्चिम रेल्वेला उत्तर भारतात सोडलेल्या श्रमिक विशेष गाड्यांच्या धर्तीवर गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर योग्य दरात विशेष गाड्या सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केलेली आहे.