आव्हाडांनी मदत केलेल्या अडवाणींच्या रथाच्या ‘सारथ्या’चा कोरोनामुळे मृत्यू


कल्याण : 1990 साली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथ यात्रा काढली होती. त्यावेळी त्यांच्या रथ यात्रेतील रथाचा सारथी असलेले सलीम मखानी यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. सलीम मखानी यांच्या फुप्फुसांना इन्फेक्शन झाले होते. त्यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. सलीम मखानी यांच्यावर 4 जुलैपासून भायखळा येथील मदिना रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, यादरम्यान सलीम मखानी यांची प्राणज्योत मालवली. सलीम मखानी यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने दोन महागडी इंजेक्शन्स पाठवली होती.

लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेत सलीम मखानी हे सहभागी झाले होते. त्याचबरोबर ते रथाचे सारथी होते. सलीम मखानी यांचे सर्व राजकीय मंडळींशी जवळचे संबंध होते. सलीम यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात केडीएमसी कॉन्ट्रॅक्टर अससोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सलीम मखानी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक जिवंत उदाहरण होते.

4 जुलै रोजी डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात सलीम मखानी यांना दाखल करण्यात आले होते. पण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना काही काळ खोळंबून रहावे लागले. अनेक प्रयत्न करुनही त्यांना बेड मिळाला नाही. धक्कादायक म्हणजे सलीमभाई यांना शास्त्री नगर रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर हातात धरून खुर्चीवर बसून रहावे लागले होते. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी वेळेचं गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने बेड मिळवून दिला. त्याचबरोबर दोन महागडी इंजेक्शन्स पाठवून दिली. नंतर सलीम भाई यांना भायखळा येथील मदिना रुग्णालयात हलवण्यात आले होते.