तुकाराम मुंढेंनी नागपुरात जाहिर केला जनता कर्फ्यू


नागपुर – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत २५ आणि २६ जुलै असे दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची महापालिकेत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे महापौर संदीप जोशी आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे संघर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र आल्याचे पहायला मिळाले. दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला.

नागपूरमध्ये उद्या आणि परवा दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून नागरिकांनी स्वत: कर्फ्यू पाळावा. २७,२८,२९ आणि ३० तारखेला लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरुन आवाहन करणार आहेत. लॉकडाउन लावणे योग्य ठरणार नसल्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

उद्या-परवा जनता कर्फ्यू असणार आहे, त्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असतील, जनतेने हा कर्फ्यू पाळावा. लॉकडाउन करायची वेळ आली तर तो अत्यंत कडक असेल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ३१ तारखेला नागपूरमध्ये पुन्हा बैठक घेऊन लॉकडाउनबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मेडिकल आणि दूध याशिवाय कोणी घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

गुरुवारी फेसबुकच्या माध्यमातून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, शहराला नव्हे तर कोरोनाला टाळेबंदी लावायची आहे. मला काहीच होणार नाही, अशा अविर्भावात कुणी राहू नये. दोन हजारांच्या वर शहरात कोरोनाबाधित आहेत. गेल्या महिन्यात मृत्यूदर १ टक्केच्या खाली होता. आता तो १.५६ टक्के झाला आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. आपल्या समोरचा माणूस कोरोनाबाधित आहे, असे समजून काळजी घेतली पाहिजे तर आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो, असे सांगितले. ऑगस्ट महिन्यात ईद, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दहीहंडी, महालक्ष्मीपूजन आदी उत्सव आहेत. परंतु सार्वजानिकरित्या हे उत्सव साजरे करू नका. नियमांचे पालन करून घरीच उत्सव साजरा करा, असे आवाहनही त्यांनी केले होते.