३० वर्षाय व्यक्तीला देण्यात आला भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस


नवी दिल्ली – एम्स रुग्णालयात स्वदेशी COVAXIN या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीस सुरुवात झाली असून या स्वदेशी लसीचा पहिला डोस ३० वर्षीय स्वयंसेवकाला देण्यात आला आहे. एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, दोन तास रुग्णालयात या स्वयंसेवकाला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. पहिली स्वदेशी COVAXIN ही कोरोना प्रतिबंधक लस भारत बायोटेक या फार्मा कंपनीने तयार केली आहे.

रुग्णालयात स्वयंसेवकाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर घरी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. देशभरातील अनेक स्वयंसेवकांनी मानवी चाचणी करण्यासाठी तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली.

हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीकडून COVAXIN लस तयार केली जात असून यासाठी आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली आहे. नुकतेच त्यांना केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती. पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये एम्स रुग्णालयातील १०० जण असणार आहेत. एम्सच्या एथिक्स कमिटीकडून चाचणीला मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवक बनण्यासाठी आवाहन करण्यात आल्यानंतर काही तासातच एक हजारापेक्षा जास्त जणांनी स्वयंसेवक बनण्यासाठी संपर्क साधला होता.

निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी केली जाणार असून १८ ते ५५ वयोगटातील व्यक्तींचा यामध्ये समावेश असणार आहे. गर्भवती नसणाऱ्या महिलांचाही यामध्ये समावेश असणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. आयसीएमआरने देशभरात COVAXIN च्या वैद्यकीय चाचणीसाठी निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एम्स हे एक ठिकाण आहे. दुसऱ्या टप्प्यात या लसीची सर्व १२ ठिकाणांवरील एकूण ७५० जणांवर चाचणी केली जाणार आहे.