स्थलांतरित मजुरांना रोजगार देणार सोनू सूदचे ‘प्रवासी रोजगार’अ‍ॅप


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सातत्याने स्थलांतरित गरीब मजुरांच्या घरवापसीचे काम करत होता. अद्यापही त्याच्या मदतीचा ओघ सुरूच असून त्याने आता स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली आहे. त्याने ‘प्रवासी रोजगार’ या नावाने अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपवर मजुरांना रोजगार शोधण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व लिंक्स मिळतील.

सोनू सूद ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, गेल्या काही महिन्यांपासून या अ‍ॅपसाठी फार विचार, प्लॅनिंग व तयारी केली. यासाठी दारिद्र्यरेषेखालील तरुणवर्ग, स्वयंसेवी संस्था, सल्लागार, स्टार्टअपचे तंत्रज्ञ, तळागाळावर काम करणाऱ्या संस्था आणि घरी परतण्यास मी मदत केलेल्या मजुरांशी सल्ला मसलत केली. या अ‍ॅपद्वारे बांधकाम, कापड व्यवसाय, आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, ऑटोमोबाइल, ई-कॉमर्स या विविध क्षेत्रांतील ५०० कंपन्यांतील नोकरीच्या संधींची माहिती मिळेल. सोनू सूद लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित, गरीब मजुरांसाठी ‘देवदूत’ म्हणून मदतीला धावून आला आहे. त्याच्या या कामाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.