‘फेक फॉलोअर्स’ प्रकरणी मुंबई पोलिसांकडून होऊ शकते दीपिका, प्रियंकाची चौकशी


आपल्यापैकी अनेकजण सोशल मीडियाचा वापर करत असतील, त्यातच आपल्यापैकी अनेकांना आपले किती फॉलोअर्स आहेत, हे जाणून घेण्याची फार उत्सुक्ता असते. कारण सध्याच्या घडीला ज्याचे जास्त फॉलोअर्स तेवढे जास्त त्या व्यकीचे महत्व असे गणितच झाले आहे. पण सध्या फॉलोअर्सचा आकडा वाढवण्यासंबंधितील काळाबाजार होऊ लागल्याचा धक्कादायक ट्रेण्ड दिसून येत आहे.

त्यातच अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटींनाही त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ही खूप महत्वाची वाटते. जितके ज्यास्त त्यांचे फॉलोअर्स तितकी त्यांची जास्त किंमत असे गणित या डिजीटल जगातील लोकप्रियतेसाठी मांडले जाते. पण या अशा खोट्या फॉलोअर्सवर आता मुंबई पोलिसांची नजर पडली असून सोशल मिडियावर खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

हा तपास सुरु झाल्यापासून बरीच माहिती पोलिसांच्या हाती लागली असून. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रासंदर्भात मोठा खुलासा करण्यात आला आहे. या दोन अभिनेत्रींसोबतच इतर १० सेलिब्रिटींचे नाव सर्वाधिक फेक फॉलोअर्स असणाऱ्या यादीमध्ये आहे.

इंस्टाग्रामच्या भाषेत फेक फॉलोअर्सला ‘बॉट्स’ असे म्हटले जाते. अनेक कलाकार आणि प्रभावशाली व्यक्ती याच ‘बॉट्स’च्या मदतीने आपल्या फॉलोअर्सची संख्या फुगवून दाखवतात. हे बॉट्स विकत घेतलेले असतात. म्हणजेच पैसे देऊन फॉलोअर्सची संख्या वाढवता येते.

ही माहिती समोर आल्यानंतर आता मुंबई पोलीस या चौकशीचा भाग म्हणून लवकरच अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोणसोबतच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार असल्याचे वृत्त डीएनए या संकेतस्थळाने दिले आहे. मुंबई पोलिसांचे विशेष पथक येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये या अभिनेत्रींबरोबरच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार असल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे.

दीडशे लोकांचा जबाब खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील या तपासादरम्यान नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी फेक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींची यादीच तयार केली आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींबरोबरच अनेक खेळाडू, बिल्डर आणि हाय प्रोफाइल व्यक्तींची नावे या यादीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चौकशीदरम्यान सेलिब्रिटींकडे मुंबई पोलीस त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येसंदर्भात प्रश्न विचारु शकतात. सर्व फॉलोअर्स हे खरे असून फॉलोअर्सचा आकडा फुगवून सांगण्यासाठी कोणत्याही कंपनीची किंवा चुकीच्या पद्धतीचा वापर केला नाही हे सेलिब्रिटींना पोलिसांना पटवून द्यावे लागणार आहे.

आतापर्यंत १८ लोकांची या फेक फॉलोअर प्रकरणात चौकशी झाली आहे. या व्यक्तींची चौकशी पोलिसांनी केली आहे ते सर्वजण हे छोट्या पडद्याशी म्हणजेच मालिका आणि टीव्हीवरील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत. यामध्ये कलाकारांबरोबरच निर्माते, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, कोरियोग्राफर आणि सहाय्यक दिग्दर्शकांचा समावेश आहे. फेक फॉलोअर्स संदंर्भात भारतामध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच चौकशी केली जात आहे.