पूर्व प्राथमिक, पहिली, दुसरीपर्यंतच्या ऑनलाईन वर्गाचे सुधारित वेळापत्रक जाहीर


मुंबई : ऑनलाईन शिक्षणाचे धडे आता पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गासाठी सुद्धा दिले जाणार असून शिक्षण विभागाकडून त्यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटे पूर्व प्राथमिकचे वर्ग घेणार असून पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तर सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटांमध्ये पहिली आणि दुसरी इयत्तेसाठी दोन सत्र घेतले जाणार असून 15 मिनिटे पालकांशी संवाद व मार्गदर्शन तसेच 15 मिनिट विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण दिले जावे, असे निर्देश शाळांना देण्यात आहेत.

उच्च न्यायालयाने पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गाला ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळांवर कारवाई करू नये असे अंतरिम आदेश दिल्यानंतर शिक्षण विभागाने यू-टर्न घेतला आहे. शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर बुधवारी (22 जुलै) नवीन परिपत्रक जाहीर करुन आता पूर्व प्राथमिक व पहिली, दुसरीसाठी सुद्धा ऑनलाईन वर्ग घेण्याचे वेळापत्रक जाहिर केले आहे. यामध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 45 मिनिटांची दोन सत्रे शाळा घेऊ शकणार आहेत तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची 45 मिनिटांची एकूण चार सत्रे शाळा घेऊ शकणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या वर्गांचे ऑनलाईन शिक्षण कसे आणि किती वेळ घ्यावे याबाबत सूचना जारी केल्या आहेत. याआधी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अंदाजे तारखा शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण देण्याचेही निर्देश देण्यात आले होते. पण त्यात आता काही बदल करण्यात आला असून अतिरिक्त सूचना पुन्हा जारी करण्यात आल्या आहेत.

पूर्वप्राथमिक ते दुसरी पर्यंतच्या वर्गाना ऑनलाईन शिक्षण देऊ नये असा निर्णय सुरुवातीच्या सूचनांमध्ये घेण्यात आला होता. पण या निर्णय विरोधात पालक शिक्षक संघटना उच्च न्यायालयात गेल्या आणि या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यात आली. त्यानुसार शिक्षण विभागाने पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतचे ऑनलाईन शिक्षण कसे असावे याबाबतच्या सूचना दिल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत शिक्षक, पालकांना देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.