ईदसाठी राज्य सरकारने काढलेली नियमावली अमान्य – इम्तियाज जलील


औरंगाबाद : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच राज्य सरकारकडून सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला बकरी ईदचा सण देखील साधेपणाने साजरा करावा असे आवाहन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समुदायाला केले आहे. त्याकरिता राज्य सरकारकडून नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. पण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही निमयमावली अमान्य असल्याचे म्हणत त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ईदसाठी ऑनलाइन खरेदी विक्री करण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जलील यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यांना शक्य असेल, ती मंडळी ऑनलाईन खरेदी, विक्री करु शकतील. पण एक,दोन जनावरे असलेल्या व्यक्तींनी काय करायचे ? नेते, अधिकारी याच्याकडे स्मार्टफोन असतात. गरिबांकडे ती सोय नसते. त्यांचा विचार कोण करणार ? जनावरे विकून दोन पैसे मिळवणाऱ्यांचा विचार कोणी करायचा, असे प्रश्न जलील यांनी उपस्थित केले आहे.
फक्त आमच्यासाठीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेले नियम आहेत का, असा प्रश्न जलील यांनी विचारला आहे. आम्हाला गर्दी टाळण्यासाठी निर्देश देण्यात येतात. पण पंतप्रधान मोदींना हेच नियम लागू होत नाहीत का ? त्यांना देखील 5 ऑगस्टला राम मंदिराचा कार्यक्रम प्रतिकात्मक करायला सांगा. त्यांना दिल्लीतून प्रतिकात्मक भुमिपूजन करु द्या, अशा शब्दांत जलील यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला.