‘शकुंतला देवी’तील पहिलेवहिले गाणे तुमच्या भेटीला - Majha Paper

‘शकुंतला देवी’तील पहिलेवहिले गाणे तुमच्या भेटीला


लवकरच ‘शकुंतला देवी’ या आगामी चित्रपटात विविध अभ्यासपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री विद्या बालन झळकणार असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील पहिलेवहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे.

नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला ‘शकुंतला देवी’ या चित्रपटातील ‘पास नहीं तो फेल नहीं’ हे पहिलेवहिले गाणे आले आहे. विशेष म्हणजे या गाण्यात विद्या पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे. विद्या या गाण्यातून विद्यार्थ्यांना वर्गात बसून गणित किती सोपे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

या गाण्याबाबत सांगताना विद्या म्हणाली की, चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करताना खूप आनंद होत आहे. पास नहीं तो फेल नहीं हे गाणे मला फार आवडले असून आकड्यांसोबत संवाद साधण्याची एक मजेशीर पद्धत या गाण्यातून समोर आणण्यात आली आहे. या गाण्यातून गणित या विषयाचा फोबिया दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा खूपच गमतीशीर पद्धतीने शिकवण्याचा अनुभव आहे. मुलांसोबत हे व्हर्चुअल सेशन करताना आणि त्यांच्यासोबत हा मंच शेयर करताना खूप आनंद आला. हा एक वेगळा परंतु चांगला अनुभव होता.

दरम्यान, सचिन-जिगर या जोडीने सुनिधी चौहानच्या आवाज स्वरबद्ध झालेले हे गाणे कंपोज केलं आहे. तर प्रसिद्ध गीतकार वायू यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्यात या चित्रपटात ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा विद्याच्या मुलीची भूमिका साकरत आहे. त्यासोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.