समाजवादीच्या खासदाराचे अजब तर्कट; कोरोना ही अल्लाहने दिलेली आपल्या क्रुकर्माची शिक्षा


लखनौ – देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली असून त्यापैकी 7 लाख 53,050 रुग्ण बरे झाले आहेत. पण या कोरोनामुळे देशातील 28,770 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यातच या महामारीवर मात करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ प्रतिबंधक लसीचा शोध लावत आहेत, तर जगभरातील काही संस्थाच्या या लसीच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत.

पण याच दरम्यान अजब तर्कट आणि वक्तव्य करणाऱ्यांची आपल्या देशात कमी नसल्याचे एक ताजे उदाहरण सध्या समोर आले आहे. समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर रहमान यांनी कोरोना हा आजार नसून अल्लाहने आपल्या क्रुकर्माची दिलेली शिक्षा असल्याचे अजब तर्कट मांडले आहे. त्याचबरोबर यापासून बचाव करण्याचा उपाय देखील त्यांनी सुचवला आहे.

अवघ्या काहीदिवसांवर बकरी ईदचा सण येऊन ठेपला आहे. पण कोरोनामुळे अनेक ठिकाणाच्या मशिदी बंद आहेत. या पार्श्वभूमीवर शफीकुर रहमान यांनी अजब वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, बाजारपेठा बकरी ईदच्या निमित्ताने उघडल्या पाहिजेत. जेणेकरून लोक बकरी खरेदी करून कुर्बानी देऊ शकतील. त्याचबरोबर मशिदी देखील उघडल्या गेल्या पाहिजेत. तेथे लोक एकत्र येऊन कोरोनाच्या नाश करण्यासाठी प्रार्थना करतील. अजूनही कोणतेही औषध कोरोनावर सापडलेले नाही. याचा अर्थ, हा आजार नव्हे, तर आपल्या चुकीच्या कामाची अल्लाहने दिलेली शिक्षा असल्यामुळे अल्लाहकडे प्रार्थना करणे, हाच त्यावरचा यशस्वी उपचार आहे.

दरम्यान इस्लामी शिक्षण संस्थान दारुल उलून देवबंद यांनी उत्तर प्रदेश राज्य सरकारकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मश्जीदीत नमाज पठण करण्यासाठी परवानगी देणे आणि कुर्बानीसाठी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रही लिहिले आहे.