महामानवाच्या गौरवगाथेत पहायला मिळणार बाबासाहेबांचा राजगृहातील प्रवेश


स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा मालिकेत बाबासाहेबांचा दादर येथील राजगृहातील प्रवेश हा महत्वाचा ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळणार आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील ही वास्तू महत्वाचा भाग असून त्यांचे या वास्तूमधील वास्तव्य नेमके कसे होते हे पुन्हा एकदा मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. राजगृहाची हुबेहुब प्रतिकृती दीड महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर उभारण्यात आली. राजगृहाचा हुबेहुब सेट कलादिग्दर्शक अजित दांडेकर यांनी उभारला आहे. त्यांनी हा सेट उभारण्याआधी दादर येथील राजगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन या ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास केला. राजगृहाची प्रतिकृती साकारणे हे खूप मोठे आव्हान होते.

अत्यंत कठीण परिस्थितीत बाबासाहेबांचे सुरुवातीचे दिवस गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली आणि अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकील म्हणून ख्याती पसरली. 1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचे कार्यालय परळच्या दामोदर ह़ॉलजवळ होते. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरे पडू लागले होते. पुस्तकांची आबाळ होत होती म्हणून त्यांनी स्वतःसाठी नवीन घर बांधण्याचा निश्चय केला.

स्वतःची इमारत उभी करताना त्यात ग्रंथालय कसे असावे, याचा बाबासाहेबांनी अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला होता. आपल्याकडेही परदेशात पाहिलेल्या उत्तमोत्तम ग्रंथालयांची वैशिष्ट्ये असावीत, असा प्रयत्न त्यांनी केला. त्या रचनेत तीन-तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स त्यांनी राजगृहाच्या तळमजल्यावर बांधून घेतले होते. त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या राहण्याची त्या दोन ब्लॉक्समध्ये व्यवस्था केली होती.

डॉ.बाबासाहेबांनी राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर स्वत:च्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वत: आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या. १९३१ च्या जानेवारी महिन्यात इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु झाले आणि राजगृहाचे बांधकाम १९३३ मध्ये पूर्ण झाले आणि बाबासाहेब आपल्या कुटुंबीयांसह राजगृह या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूत राहण्यास आले. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेली ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे. इतिहासाच्या या पाऊलखुणा पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून अनुभवायला मिळणार आहे.