दोन रुपयांच्या वर्तमानपत्रासोबत मास्क मोफत; ए. आर. रेहमान यांनी केले कौतुक


देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच असून देशातील लाखो लोकांना या जीवघेण्या रोगाची लागण झाली आहे. पण अद्याप या जीवघेण्या रोगावर कोणतीही प्रतिबंधक लस तयार झालेली नाही. त्यामुळे देशातील प्रत्येकजण आपआपल्या परीने आपली काळजी घेत आहेत. त्यासाठी देशातील नागरिक सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करत आहेत. पण काहीजण या गोष्टींचा वापर करण्याचे टाळत आहेत. अशाच मंडळींना मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी काश्मिरमधील एका वर्तमानपत्राने अनोखी आयडिया वापरली असून त्यांनी आपल्या वर्तमानपत्रासोबत फ्री मास्कचे वाटप केले आहे.

याबाबतची माहिती प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी ट्विट करुन आपल्या चाहत्यांना दिली. रोशनी असे या वर्तमानपत्राचे नाव आहे. विशेष म्हणजे या वर्तमानपत्राची किंमत केवळ दोन रुपये आहे. पण तरी देखील मास्कबाबत जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी वर्तमानपत्रासोबत मास्कचे वाटप केले. सोशल मीडियाद्वारे त्यांच्या या कृतीचे कौतुक केले जात आहे.