GOOD NEWS! ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना प्रतिबंधक लसीची ह्युमन ट्रायल यशस्वी


नवी दिल्ली : संपूर्ण जगभरावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा समूळ नाश करण्यासाठी संपूर्ण जगातील संशोधक अहोरात्र प्रयत्नरत आहेत. त्यातच मागील काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोनाला रोखणारी लस विकसित करण्याचे काम ऑक्सफर्ड विद्यापीठ करत आहे. पहिल्या स्टेजमध्ये केलेल्या लसीच्या मानवी परीक्षणाचे निकाल ऑक्सफर्डला सकारात्मक मिळाले, असून द लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये या संदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी मानवी शरीरात ही लस रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते.

जेनर इन्स्टिट्यूटने अधिकृत AZD1222 या नावाने ओळखली जाणारी ही लस बनवली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, लस कोरोनापासून दुहेरी संरक्षण जेनर इन्स्टिट्यूटची ही प्रदान करु शकेल, ही लस शरीरात अँटीबॉडी आणि किलर टी- सेल्स बनवण्यात मदत करु शकते. ज्यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल.

या लसीचे यशस्वी होणे भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. कारण पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने या लसीसाठी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे या लसीचे कोट्यवधी डोस तयार आहेत. या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी त्यांनीही घेतली आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचे यश आता फार महत्त्वाचे ठरणार आहे. ते यशस्वी झाल्यास कोरोनावर खऱ्या अर्थाने उत्तर सापडलेले असेल.

आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च संस्था तसेच पुण्यातील एनआयव्ही म्हणजे राष्ट्रीय विषाणु विज्ञान संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या औषध कंपनीने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस बनवली आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच या लसीच्या परवानगी देताना आयसीएमआरने 15 ऑगस्टपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्याचे आवाहन भारत बायोटेक कंपनीला केले आहे. सोशल मीडियात हे पत्र खूप व्हायरल झाले होते. जेमतेम दीड महिन्यात लस बनवणे शक्य आहे का? मानवी चाचण्यांच्या सर्व टप्प्यांच्या संशोधनासाठी हा कालावधी अपूर्ण आहे, अशा चर्चाही मोठ्या प्रमाणात झाल्या.