
नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) साधारण २८० आऊटलेट्स कॅफे कॉफी डे अर्थात सीसीडी ने बंद केली आहेत. कंपनीने हे आऊटलेट्स नफ्याशी संबंधित मुद्द्यांमुळे आणि भविष्यातील खर्चात होणारी वाढ लक्षात घेता बंद केली आहेत. ही स्टोअर बंद झाल्यानंतर ३० जून, २०२० रोजी कंपनीच्या एकूण आऊटलेटची संख्या १ हजार ४८० एवढी झाली आहे. सीसीडीची मालकी कॉफी डे ग्लोबलकडे असून कॉफी डे एंटरप्राइजेज लिमिटेडची (सीडीईएल) उपकंपनी आहे.
‘कॅफे कॉफी डे’ने देशभरातील २८० आऊटलेट्सना ठोकले टाळे
दररोज सरासरी विक्री कॉफीच्या या आऊटलेट्स साखळीत कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्याची सरासरी दैनंदिन विक्री एप्रिल ते जून या काळात १५ हजार ४४५ होती, जी मागील वर्षातील तिमाहीत १५ हजार ७३९ होती. दरम्यान, या तिमाहीत कंपनीच्या वेंडिंग मशीनची संख्या वाढून ५९ हजार ११५ युनिट झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ती ४९ हजार ३९७ युनिट्स एवढी होती.
कमी मार्जिन आणि अधिक कार्यशील भांडवलाची गरज यामुळे निर्यातीसंदर्भातील कामे तात्पुरती थांबविण्यात आली आहेत. या गेल्या तिमाहीत नफ्यातील संभाव्य वाढ आणि मोठ्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सुमारे २८० आऊटलेट्स बंद करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.
