मोदींसह भाजपचे ज्येष्ठ नेते देखील राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार


नवी दिल्ली – अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु असून राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण अनेक व्हीआयपींना देण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा सुद्धा समावेश आहे.

लालकृष्ण आडवाणी यांच्या अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढणार आहे. त्याचा मनापासून आनंद होत आहे. आडवाणीजींचे राजकीय क्षेत्रातील धर्मनिरपेक्षतेच्या चुकीच्या कल्पना मोडून काढण्यात मौलिक योगदान विसरता येणार नाही. विद्यमान भारतामध्ये आडवाणींनी राजकीय हिंदुंचे पुनर्निर्माण केले, असे स्वपन दासगुप्ता यांनी म्हटले आहे. स्वपन दासगुप्ता पत्रकार असून राज्यसभेवर खासदार आहेत.

कोरोना व्हायसरमुळे लांबणीवर पडलेल्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. हा कार्यक्रम भव्य पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती राम मंदिर उभारण्याची जबाबदारी असणाऱ्या राम मंदिर ट्रस्टने दिली आहे. ५० हून अधिक व्हीआयपी या कार्यक्रमासाठी हजर असणार आहेत. सीसीटीव्ही स्क्रीन संपूर्ण अयोध्येत लावण्यात येणार आहेत जेणेकरुन भक्तांना कार्यक्रम लाइव्ह पाहता येईल, अशी माहिती ट्रस्टने दिली आहे.