राजीव गांधींच्या मारेकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न


नवी दिल्ली – माजी पंतप्रधान राजीव गांधींची मारेकरी असलेली नलिनीने सोमवारी रात्री नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे. गेल्या २९ वर्षांपासून नलिनी तामिळनाडूमधील वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तिने तिथेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

नलिनीने गेल्या २९ वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीचे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या वकिलाने सांगितले आहे. तिच्यासोबत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत नलिनीचे भांडण झाले होते. यानंतर इतर कैद्यांनी हे प्रकरण जेलरपर्यंत नेले होते. यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वकिलाने सांगितले आहे. त्यांनी यावेळी यामागील खरे कारण समोर आले पाहिजे, अशी मागणीही केली आहे.

दरम्यान राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलवले जावे अशी मागणी वकिलाकडे केली आहे. यासाठी लवकरच कायदेशीर विनंती करणार असल्याची माहिती वकिलाने दिली आहे.