पुण्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लॉकडाऊनमध्येच सर्वाधिक वाढ


पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार पुण्यात 14 जूनपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. पण पुण्यातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत लॉकडाऊनच्या काळातच आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. पुण्यात काल दिवसभरात 2459 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 61 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला

14 तारखेपासून पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यादरम्यान, म्हणजेच, 14 जून ते 19 जून या कालावधीत पुणे जिल्ह्यात 11577 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 245 रुग्णांचा या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर याआधी 7 जून ते 12 जून या आधीच्या सात दिवसांच्या कालावधीत पुण्यात 8658 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 184 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्ण संख्या ही किती हे लोकांच्या टेस्ट होतात यावर अवलंबून असते आणि पुण्यातील टेस्टचे प्रमाण वाढवण्यात आल्यानेच रुग्णसंख्या वाढल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

असा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख गेल्या काही दिवसांमध्ये वेगाने वरती गेल्यामुळेच मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबलसिंह चहल यांना पुण्यात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आले होत. तसेच, दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख पाहून पुण्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उपयोग कसा झाला असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

पुण्यात लागू असलेल्या लॉकडाऊनचा उपयोग काय झाला असा प्रश्न काहीजण विचारताना दिसत आहेत. तर लॉकडाऊन पुन्हा लागू केला नसता, तर कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊनचा उपयोग बेड आणि व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्यासाठी करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

दरम्यान, 13 तारखेला मध्यरात्रीपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्यांना लागून असलेल्या गावांमधे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीचा, पुणे कॅन्टेन्मेट आणि हवेली तालुक्यातील गावांचा यामधे समावेश होतो. हा लॉकडाऊन 10 दिवसांसाठी म्हणजे 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे.