मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण


मुंबई – मुंबईचे पालकमंत्री तसेच राज्यातील कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली असून यासंदर्भातील माहिती स्वतः अस्लम शेख यांनी ट्विट करुन दिली आहे. आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नसून विलगीकरण केल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आपण कोरोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे.

अस्लम शेख यांनी केलेल्या ट्विटमध्ये, मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माझ्यामध्ये सध्या कोरोनाची कोणती लक्षणे नसून, स्वत:चे विलगीकरण केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी कोरोनाची चाचणी कऱण्याची विनंती करतो. मी घरातून काम करत राज्यातील लोकांची सेवा करण्याचे काम सुरु ठेवणार आहे. राज्यात रविवारी ९,५१८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली . त्यामुळे एकूण संख्या आता ३,१०,४५५ एवढी झाली आहे. राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १,२८,७३० एवढी आहे.

पुढील दोन आठवडय़ांत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय प्रारूपानुसार व्यक्त केला आहे. राज्यात पुढील दोन महिन्यांत संक्रमण नियंत्रित होईल असा अंदाज या प्रारूपानुसार व्यक्त करण्यात आला आहे. गेले काही महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ठप्प झालेले जनजीवन अद्यापही सुरळीत झालेले नाही. रोज राज्यातील रुग्णसंख्या वाढते आहे. पण सुरुवातीच्या टप्प्यांत सर्वाधिक संक्रमण झालेल्या मुंबईसाठी मात्र आशादायक वाटावा असा अहवाल आयआयटी मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी दिला आहे. पुढील दोन आठवडय़ांत मुंबईतील संक्रमण नियंत्रणात येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Loading RSS Feed