राज्यातील कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक; काल एकाच दिवसात 9518 नव्या रुग्णांची नोंद


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत असल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस धक्कादायक वाढ होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होणे तर दूरच राहिले पण आधीपेक्षा त्यात झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात काल दिवसभरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात तब्बल 9 हजार 518 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 10 हजार 455 लाखांवर पोहोचला आहे. यापैकी 1 लाख 69 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 15 लाख 64 हजार 129 नमुन्यांपैकी 3 लाख 10 हजार 455 (19.85 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 54 हजार 370 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 45 हजार 846 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे काल एकूण 3 हजार 906 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर आजवर 1 लाख 69 हजार 569 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.62 टक्के एवढे आहे. राज्यात काल दिवसभरात 258 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 4.65 टक्के एवढा आहे.