सुशांतच्या आयुष्यावर आधारित ‘Suicide or Murder’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे ‘सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया’ असे नाव असणार आहे. टीक-टॉक स्टार सचिन तिवारी या चित्रपटात सुशांतची भूमिका साकारणार आहे. टीक-टॉक स्टार सचिन तिवारीचे फोटो सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हुबेहुब सुशांतसारखाच सचिन दिसतो, असा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येत होता. त्यामुळे सुशांतच्या आयुष्यावर आधारीत असणाऱ्या या चित्रपटात सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.

सुशांतच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती विजय गुप्ता करणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु असून सप्टेंबरपासून शुटिंग सुरु केले जाऊ शकते. या चित्रपटाचे शुटिंग मुंबई आणि पंजाबमधील काही ठिकाणी केले जाऊ शकते, अशी प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. तसेच हा चित्रपट याच वर्षी ख्रिसमसला रिलीज केला जाऊ शकतो.

https://www.instagram.com/p/CC11YDKhKzV/?utm_source=ig_web_copy_link

विजय गुप्ता निर्मित ‘सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. प्रोडक्शन हाऊसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सचिन तिवारी सुशांतच्या भूमिकेत दिसून येत आहे. या पोस्टरवर सचिनला इन्ट्रोड्यूस करताना त्याचा उल्लेख आऊटसायडर (Outsider) असा केला आहे. कारण सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ माजली असून बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तसेच अनेकजण सुशांत इडस्ट्रीमध्ये आऊटसायडर होता. त्यामुळेच त्याला सतत सगळ्यांच्या टिकेचा सामना करावा लागत होता असा आरोप करत आहेत.