… म्हणून अंपायरला चक्क चेंडू करावा लागला सॅनिटायझ

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या संकटातही इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या संघात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या डोम सिबलेने चेंडूवर लाळचा वापर केला. यामुळे मैदानावरील अंपायर्सला आयसीसीच्या नवीन दिशानिर्देशांतर्गत चेंडूला चक्क सॅनिटायझ करावे लागले. आयसीसीच्या कोव्हिड-19 दिशानिर्देशांतर्गत ही पहिलीच वेळ आहे की जेव्हा एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चेंडूला सॅनिटायझ करण्यासाठी अंपायर्सला हस्तक्षेप करावा लागला.

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्टइंडिचा संघ फलंदाजी करत असताना अंपायर माइकल गॉफ चेंडूला सॅनिटायझ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करताना दिसले. सिबलेने चेंडूवर लाळेचा वापर करताच, इंग्लंडच्या संघाने अंपायर्सला याची माहिती दिली.

आयसीसीच्या नवीन नियमांतर्गत जैव सुरक्षित वातावरणासाठी चेंडूला चमकविण्यासाठी केवळ घामाचा वापर करता येईल. नवीन नियमांतर्गत नकळत लाळेचा वापर केल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघाला चेतावणी दिली जाईल. संघाला दोनदा चेतावणी दिल्यानंतर 5 धावांचा दंड लागेल.