गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकणातील काही गावांची नियमावली


सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागणार असल्यामुळे दिलेल्या मुदतीनंतर गावाकडे पोहचणाऱ्या चाकरमान्यांकडून दंड आकारण्यात येणार आहे. त्यातच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांवरुन राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे, तर दुसरीकडे कोकणातील गावागावात यासंदर्भात वेगवेगळ्या नियमावल्या बनवल्या जात असल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे.

याअगोदर सोशल मीडियात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही बाबी तयार करून राज्य शासनाला पाठवणार असल्याचे वृत्त व्हायरल झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यातील सर्व बाबी रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यातील महत्त्वाची बाब कोरोनाच्या काळात तयार केलेल्या ग्रामसमितीने हेरली आहे. गावात 7 ऑगस्टपर्यंत या स्वागत करू, परंतु 7 ऑगस्ट नंतर आलात, तर दंड आकारू असा ठराव कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने घेतला आहे.

बांद्याजवळील रोणापाल गावात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमान्यांना 7 ऑगस्टपूर्वी येण्याचे आवाहन ग्राम कृती दलाने केले आहे. स्थानिक ग्राम कृती दलाने शासनाचे नियम बाजूला ठेवून घेतलेले निर्णयच सर्वांना मान्य करावे लागतील. असा एकमुखी निर्णय ग्राम कृती दल समिती व रोणापाल ग्रामस्थांनी घेतला.

गणेशोत्सव जवळ आल्यामुळे कोकणात आता क्वारंटाईनवरुन पुन्हा एकदा गोंधळ सुरु झाला आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेनेने क्वारंटाईनचा कालावधी 14 वरून 7 दिवसाचा करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर विरोधी पक्ष भाजपचे आमदार नितेश राणे यांनी क्वारंटाईन कालावधी असूच नये, अशी मागणी केली आहे. पण 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी हवाच अशी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची ठाम भूमिका असल्यामुळे चाकरमान्यांची इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था झाली आहे.

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाईनच्या मुद्यावरून मतमंतातरे असताना आता ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन स्थानिक पातळीवर 14 दिवसांचाच क्वारंटाईन कालावधी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यासाठी चाकरमान्यांना 7 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. सात ऑगस्टपर्यंत तुम्ही या, चौदा दिवस क्वारंटाईन व्हा आणि मगच गणेशोत्सव साजरा करा.

कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने तर 7 तारखेनंतर येणाऱ्या चाकरमान्यांना एक हजार रूपयांचा दंडच आकारला आहे. पाच ते दहा टक्के चाकरमान्यांनासाठी आम्ही पूर्ण गावातील लोकांच आरोग्य धोक्यात टाकू शकत नसल्याचे येथील सरंपचांचे मत आहे. कोणताही निर्णय सरकारने घेतला तरी 14 दिवस क्वारंटाईन आणि उशिरा येणाऱ्यांना एक हजार दंड असा निर्णय आपण बैठकीत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश चतुर्थीला दोडामार्ग तालुक्‍यातील गावात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्‍वारंटाईनचा कालावधी 14 दिवसांचाच राहणार आहे. अनेक जण गोव्यात दोडामार्गमधील कामासाठी जातात. पण त्यांनाही 14 दिवस अगोदर गावात येणे बंधनकारक केले आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवरील नियोजनासाठी दोडामार्गमधील महालक्ष्मी सभागृहात प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्‍यातील तीन जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांची बैठक झाली. या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोकणातील मोठा सण म्हणून गणेश चतुर्थीची ओळख असल्याने या सणाला मुंबई-पुण्याहून मोठ्या संख्येने चाकरमानी गावोगावी दाखल होतात. त्यामुळे चाकरमान्यांचे 14 दिवसांचेच क्‍वारंटाईन राहील. होम क्‍वारंटाईन करणे ज्या चाकरमान्यांना सुरक्षेच्या दृष्टीने शक्‍य असेल अशाचे होम क्‍वारंटाईन करावे व ज्या चाकरमान्यांचे होम क्‍वारंटाईन शक्‍य नसेल त्यांचे गावातच संस्थात्मक क्‍वारंटाईन करावे. गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय गावागावात घेण्यात येत आहे. पण कोकणातील चाकरमान्यासाठी राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय जाहिर केलेला नाही.