इराणसाठी धोक्याची घंटा; तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण!


तेहरान : इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशातील तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असेल असा अंदाज वर्तवला आहे. इराणमध्ये सध्याच्या घडीला अधिकृत 2 लाख 71 हजार कोरोनाबाधित आहेत. पण हा आकडा प्रत्यक्ष कितीतरी पट जास्त असेल, असे राष्ट्रपती रुहानी यांनी सांगितले आहे.

इराणमध्ये येत्या काही दिवसांत व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आणखी तीन ते साडेतीन कोटी लोक कोरोनाग्रस्त होतील, अशी भीती देखील रुहानी यांनी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाच्या एका सर्वेक्षणाच्या आधारे रुहानी यांनी हा आकडा सांगितला आहे. या रोगाला लोकांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

इराणमधील कोरोना संक्रमण मे महिन्यामध्ये कमी होण्यास सुरुवात झाली होती. पण त्यानंतर बाधित आणि मृतांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. इराणची लोकसंख्या 8 कोटी आहे. अडीच कोटी लोक बाधित झाले असतील आणि आणखी साडे तीन कोटी बाधित होतील असा अंदाज रुहानी वर्तवला आहे. त्यातच अजून हर्ड इम्युनिटी मिळाली नसल्याचे राष्ट्रपती रुहानी यांनी सांगितल्यामुळे इराणसारखा महत्वाचा देश हर्ड इम्युनिटीसाठी प्रयत्न करत आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे.

पश्चिम आशियामध्ये कोरोना संक्रमणाने इराण हा देश सर्वाधिक प्रभावित झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार 2 लाख 70 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कमीत कमी 13 हजार 979 रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्यानुसार मागील 24 तासांत 2 हजार कोरोना पॉझिटिव्ह केसेस तर 188 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राष्ट्रपती हसन रुहानी यांच्या दाव्यानुसार जर अडीच कोटींहून अधिक लोकांना देशात कोरोनाची लागण झाली आहे, शिवाय व्यवस्थित काळजी घेतली नाही तर इराणमध्ये येत्या काही दिवसांत आणखी तीन ते साडेतीन कोटी लोक कोरोनाग्रस्त होतील, अशी भीती देखील रुहानी यांनी व्यक्त केली.

त्यांचा हा दावा जर खरा ठरला तर इराणसाठी हा धोक्याची घंटा आहे. कारण, इराणची एकूण लोकंख्या ही 8 कोटी आहे. म्हणजे देशातील निम्म्याहून अधिक लोक कोरोनाबाधित होतील. यामुळे इराणमधील आरोग्य व्यवस्था मोडकळीस येईल. रुग्णांना उपचार मिळणार नाहीत. परिणामी देशात अराजकता माजू शकते.