३ किंवा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमीपूजन


नवी दिल्ली – रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची शनिवारी अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजना संदर्भात बैठतक पार पडली, त्यावेळी भूमीपुजनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी भूमीपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर तसे पत्र देखील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले आहे. पण भूमीपूजन नेमके कोणत्या दिवशी करायचे या संदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेतला जाणार आहे.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी शनिवारी झालेल्या बैठकीनंतर प्रस्तावित राममंदिराच्या मूळ आराखड्यात काही बदल करण्यात आल्याची माहिती दिली. आराखड्यातील या बदलानुसार मंदिरास आता पाच घुमट असणार आहेत. शिवाय, मंदिराची लांबी, रुंदी व उंची देखील वाढवण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची (ट्रस्ट) अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच, १५ सदस्यांचा समावेश न्यासामध्ये करण्यात आलेला आहे. शनिवारी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या झालेल्या बैठकीत राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह अकरा सदस्यांची उपस्थिती होती. तर अन्य चारजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

सध्या जगभरासह देशात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मंदीर निर्माण कार्यात अडथळे न उद्भवल्यास, भूमिपूजनानंतर साधारण साडेतीन वर्षात मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.