संशोधनात धक्कादायक खुलासा; या रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात जास्त धोका


मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून संपूर्ण जग कोरोनासमोर हतबल झाले आहे. याच दरम्यान जगभरात या व्हायरसबाबत अनेक तर्क वितर्क संशोधनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर या व्हायरसचा समूळ नाश करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत घेत आहेत. तसेच कोरोनाचा प्रभाव उन्हाळ्यात कमी होईल, या व्हायरसचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ व्यक्तींना असेल, त्याचबरोबर एका विशिष्ट रक्तगटाच्या व्यक्तींना याची लागण होईल, असे अनेक दावे करण्यात आले होते. पण आता यासंदर्भात जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांनी नवा दावा केला आहे.

जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांनी कोरोनासोबतच्या वेगवेगळ्या रक्तगटांच्या संबंधांचा अभ्यास केला असून यादरम्यान अनेक गोष्टी या संशोधनातून समोर आल्या आहेत. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनासाठी इटली आणि स्पेनमधील 1610 रुग्णांची संशोधकांनी निरीक्षणे नोंदवली. ज्यामध्ये अनेकांना कोरोनामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. कोरोनामुळे या सर्व रुग्णांची परिस्थिती गंभीर झाली असून त्यापैकी अनेकांचा मृत्यूही झाला आहे.

जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांच्या संशोधनानुसार, ‘A’ रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. तर कोरोनाचा संर्सग होण्याचा धोका ‘O’ रक्तगट असणाऱ्या लोकांना सर्वात कमी असल्याचे निष्पन्न झाले. संशोधनातून निष्पन्न झाल्यानुसार, जर कोरोनाची बाधा एखाद्या ‘A’ रक्तगट असणाऱ्या रुग्णाला झाली तर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता ‘O’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांपेक्षा दुप्पट असू शकते. वरील बाबी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यासंदर्भातील पुष्टी अथवा दावा माझा पेपर करत नाही.

दरम्यान, अहवालातून संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, ‘O’ रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होऊच शकत नाही. असे अजिबात नाही. तसेच युनिवर्सल डोनर म्हणून ‘O’ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती ओळखल्या जातात. म्हणजेच, जर दुसऱ्या कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज असेल तर त्याला ‘O’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचे रक्त दिले जाऊ शकते.