प्रभू रामाचे अस्तित्व शोधण्यासाठी नेपाळ पुरातत्व विभाग करणार खोदकाम

नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी काही दिवसांपुर्वी वक्तव्य केले होते की, प्रभू रामाचे खरे जन्मस्थान हे नेपाळ स्थित थोरी हे आहे. यानंतर आता नेपाळचा पुरातत्व विभाग देशातील दक्षिणी भागातील थोरी येथे खोदकाम करणार आहे व तेथील अभ्यास करण्याची योजना बनवत आहे.

के पी शर्मी ओली यांच्या अजब दाव्यानंतर वादाला सुरूवात झाली होती. त्यांच्या या निराधार वक्तव्यावरून नेपाळमधील विविध पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. ओली म्हणाले होते की, बीरगंज जवळील थोरी येथे प्रभू रामाचा जन्म झाला होता व खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे.

आता ओली यांच्या या वक्तव्यानंतर तेथील पुरातत्व विभागाने (डीओए) येथे खोदकाम आणि अभ्यासासाठी विविध मंत्रालयासोबत चर्चा सुरू केली आहे. पुरातत्व विभागाचे प्रवक्ता राम बहादुर कुंवर म्हणाले की, खोदकामासंदर्भात विविध मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे.

डीओएचे महासंचालक दामोदर गौतम म्हणाले की, विभाग विशेषज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पंतप्रधानांच्या या विधानानंतर अभ्यास करणे आमची जबाबदारी आहे. अयोध्या नेपाळमध्ये असल्याचे मात्र पर्याप्त पुरावे नाहीत.