महाराष्ट्रातील सरकार स्थिर; उलट भाजपचे आमदारच आमच्या संपर्कात – यशोमती ठाकूर


मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा विश्वासही करत उलट भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावे कळली तर राज्यात राजकीय भूकंप येईल, असा गौप्यस्फोट केला आहे. आमच्यापैकी कोणी फुटणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.

भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटकनंतर आता राजस्थानमध्येही आपला घाणेरडा खेळ आणि राजकारण सुरुच ठेवले आहे. शेणातला कीडा ज्याप्रमाणे शेणातच राहतो, तसे यांचे झाले आहे. केंद्रात सत्ता मिळाली असतानाही त्यांना राज्यांमध्ये फोडाफोडी करण्याची हाव आहे. महाराष्ट्रामध्ये काय असे जेव्हा मला सातत्याने विचारले जाते. तेव्हा सर्वांना माझे हेच सांगणे आहे की राज्यातील सरकार स्थिर आहे. देशाला नवे राजकीय समीकरण महाराष्ट्राने दिल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.

⭕ LIVEAdv. Yashomati Thakur

Posted by Santosh Mahatme on Thursday, July 16, 2020

सरकार अस्थिर करण्याचा किंवा पक्ष सोडण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याला चांगले बडवू. आम्ही गांधीवादी आहोत पण दादागिरी सहन करायची. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. तुमची गाठ आमच्याशी आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

ज्यांना घेऊन माजी मुख्यमंत्री फिरत आहेत ते बाहेरुन आलेले लोक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष किती दुर्बळ झाला आहे हे दिसत आहे. त्यांच्या १०५ पैकी आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधीही परत येतील, याबद्दल तुम्ही हमी देऊ शकत नाही. उलट १०५ पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे कळली तर राज्यात राजकीय भूकंप होईल, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे.