चिंताजनक…! देशात काल दिवसभरात ३२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – विविध उपाय योजना करुन देखील देशातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. दरम्यान काल दिवसभरात देशातील कोरोबाधितांच्या संख्येत ३२ हजार ६९५ नव्या रुग्णांची भर पडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९ लाख ६८ हजार ८७६ वर पोहोचला आहे. तसेच मागील २४ तासांत २० हजार ५७२ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत सहा लाख १२ हजार ८१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण ३ लाख ३१ हजार १४६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची गेल्या आठ दिवसांत २५ हजारांनी वाढणारी संख्या काल ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी वाढली आहे. आठ दिवसांत दोन लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. बरे होणाऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६३.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ६०६ मृत्यू झाले असून, आतापर्यंत २४ हजार ९१५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अधिकाधिक होत असलेल्या चाचण्या, वेळेवर होणारे निदान आणि प्रभावी उपचार या प्रामुख्याने तीन बाबींमुळे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.