कुटुंबातील आणखी एक सदस्याला कोरोनाची लागण; होम क्वारंटाईन झाला सौरव गांगुली


कोलकाता – काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या कुटुंबातील तीन सदस्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता गांगुली कुटुंबातील आणखी एका सदस्याचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आल्यामुळे सौरव गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. गांगुलीचा मोठा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहाशीष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्नेहाशीष यांची पत्नी आणि सासू-सासरे यांना महिनाभर आधी कोरोनाची लागण झाली होती.

खासजी केंद्रातून स्नेहाशीष यांनी कोरोना चाचणी करून घेतली आणि त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ते लवकरच दुसरी चाचणी करणार असल्यामुळे सौरव गांगुलीसह कुटुंबातील सर्व सदस्य आता सेल्फ आयसोलेट झाले आहेत आणि त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. सुरुवातीला मोमिनपूर येथे स्नेहाशीष हे राहत होते, परंतु कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ते गांगुली राहत असलेल्या घरी शिफ्ट झाल्यामुळे आता सौरवलाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

स्नेहाशीष यांना मागील काही दिवसांपासून ताप आला होता. त्यानंतर त्यांना बेल्ले व्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल आला. ते पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सुरक्षिततेची काळजी म्हणून गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याचे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.