निता अंबानींचा निर्धार; देशातील कानाकोपऱ्यात पोहोचवणार कोरोना प्रतिबंधक लस


मुंबई – काल पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी मुकेश अंबानी यांनी हक्कभाग आणि हिस्सा विक्रीतून विक्रमी गुंतवणूक खेचत सहामाहीतच कर्जमुक्त होणाऱ्या रिलायन्स समूहाने नव्या वर्षांपासून 5जी दूरसंचार सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली. दरम्यान यावेळी पहिल्यांदाच या सभेला रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन निता अंबानी यांनी संबोधित केले.

कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होताच ते देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी रिलायन्स काम करणार असल्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेला पहिल्यांदाच संबोधित करताना निता अंबानी यांनी सांगितले. कोरोनाविरोधातील लढाई अजून बाकी आहे. जिओच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या मदतीने, संपूर्ण देशभरात मेगा-स्केल कोविड टेस्टिंगसाठी सरकार आणि स्थानिक नगरपालिकांशी भागीदारी करणार आहे.
त्याचबरोबर देशभरात जास्तीत जास्त कोविड चाचण्या करता याव्यात यासाठी जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची मदत घेतली जाईल आणि तुम्हाला मी आश्वासन देते की जसे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल ते डिजिटल वितरण आणि पुरवठा साखळीचा वापर करून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचेल, हे आम्ही सुनिश्चित करू, असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या काळात, आम्ही मुंबईत फक्त दोन आठवड्यांमध्ये देशातील पहिले १०० बेड असलेले स्पेशल कोविड 19 हॉस्पिटल उभे केले. त्या हॉस्पिटलची क्षमता आता २०० बेड झाली आहे. दररोज १ लाखांहून अधिक पीपीई किट्स आणि N95 मास्कचे उत्पादन आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी घेत आहोत. याशिवाय कोरोना रुग्णाला तातडीने मदत मिळावी यासाठी रिलायन्स अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मोफत इंधन पुरवत असल्याची माहिती देखील निता अंबानी यांनी यावेळी दिली.