प्लाझ्मा दान करणाऱ्याला ‘हे’ राज्य सरकार देणार ५ हजारांचे बक्षीस


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत आहे. पण त्यात दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्यांची संख्या देखील चांगलीच आहे. त्यामुळे देशात सध्या प्लाझ्माची मागणीही वाढत आहे. प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. या दरम्यान कोरोनामुक्त लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे कर्नाटक सरकारने आवाहन केले आहे. त्याचबरोबर कर्नाटक सरकारने प्लाझ्मा दान केल्यानंतर त्याबदल्यात बक्षीसही देण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्लाझ्मा दान करुन एखाद्याचा जीव वाचवण्यासह, सरकारकडून 5000 रुपयांचे बक्षीसही देण्यात येणार आहे.

कर्नाटकातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेत कर्नाटक सरकारने प्रत्येक प्लाझ्मा दात्याला त्याच्या या कामाची दखल घेत, प्रशंसनीय रक्कम म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर म्हणाले की, राज्यात आतापर्यंत 17,390 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील 4993 लोक बंगळुरुमधील आहेत. दरम्यान कोरोनामुक्त झालेल्या लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे के. सुधाकर यांनी आवाहन केले आहे. तसेच प्लाझ्मा दात्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून कोरोनामुक्त लोकांनी स्वेच्छेने पुढे येत, इतर रुग्णांना प्लाझ्मा दान करुन त्यांना बरे होण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, देशातील पहिली प्लाझ्मा बँक दिल्लीतील Institute of Liver and Biliary Sciences (ILBS)मध्ये सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर एलएनजेपी हॉस्पिटलमध्येही दिल्ली सरकारने प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. ओडिशा सरकारनेही प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. कटक येथील एसबीसी मेडिकल कॉलेजमधील प्लाझ्मा बँकेचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी उद्घाटन केले.