बकरी ईदबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; जारी केल्या गाईडलाईन्स


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत देखील कोरोनाबाधितांच्या आकड्यात कमी होण्या ऐवजी वाढच होत आहे. त्यातच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुस्लिम समाजाच्या बकरी ईदला गणेशोत्सवा प्रमाणेच परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर बकरी ईदबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बकरी ईद साजरी करण्याबाबत नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे.

दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्यामुळे कुठल्याही कारणासाठी गर्दी करणे आपल्याला परवडणारे नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्याचमुळे बकरी ईद देखील मुस्लिम बांधवांनी घरीच साजरी करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यंदा चांगला निर्णय घेत वारकऱ्यांनीही वारीला जाणे टाळले. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

बकरी ईदसाठी अशा आहेत गाईडलाईन….

  • ऑनलाइन बकरे खरेदी करा.
  • बकरे खरेदी करण्यासाठी कोणताही बाजार भरणार नाही.
  • कुर्बानीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी करू नये.
  • प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी आपल्या नावाने ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करून घ्यावी, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याबाबत काळजी घ्यावी.
  • काही एनजीओंनी याबाबत पुढाकार घेतला आहे. मुंबईबाहेर कुर्बानी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • बकरी ईदची नमाझ राहत्या घरीच अदा करावी.