विद्या बालनच्या आगामी ‘शकुंतला देवी’चा ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘ह्युमन कॉम्प्युटर’ असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांच्यावर आधारित चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटातील विद्याचा नवा अवतार प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

विद्याची मुख्य भूमिका असलेला चित्रपट खूप दिवसांनी तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार असल्याने साहजिकच चाहते सुखावले आहेत. शकुंतला देवी यांना असलेली गणिताची आवड, गणितामुळे त्यांनी केलेले विक्रम आणि त्यांचं खासगी आयुष्य यावर जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

विद्याने अनू मेनन दिग्दर्शित ‘शकुंतला देवी – ह्य़ुमन कॉम्प्युटर’ हा चित्रपट स्वीकारल्यानंतर जवळपास चार महिने शकुंतला देवी कोण होत्या, त्यांचा अभ्यास, त्यांचे कौशल्य, त्यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व समजून घेऊन भूमिकेची तयारी करण्यासाठी घेतले. त्यानंतर चरित्रपटासाठी ज्या व्यक्तीवर आधारित चित्रपट आहे, त्या व्यक्तीशी मिळताजुळता लूक यातही विद्याने कोणतीच कसर बाकी ठेवली नाही.

विद्याच्या मुलीची भूमिका या चित्रपटात ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा साकारत आहे. त्याचबरोबर जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment