मॉर्डनाच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचा सकारात्मक निष्कर्ष


मुंबई : जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झाले असून या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी जगभरातील अनेक देश यावरील प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच अमेरिकेतील मॉडर्ना या औषध बनवणाऱ्या कंपनीच्या दाव्यामुळे या लसीबाबत असलेली अपेक्षा वाढली आहे. दरम्यान मॉडर्नाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले असून या लसीच्या सकारात्मक निष्कर्षाच्या माहितीनंतर अमेरिकी शेअर बाजारात मॉडर्नाच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यासंदर्भात नॅशनल इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये 45 निरोगी प्रौढ लोकांवर राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि मॉडर्ना इंक यांनी कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी केली. या चाचणीत सहभागी झालेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास चांगली मदत झाल्याची माहिती आहे. आता प्रायोगिक स्तरावर 27 जुलैपासून सुमारे 30 हजार लोकांवर लसीची मोठी चाचणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या लसीचा हा टप्पाही यशस्वी झाल्यास कंपनी लस बनवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करु शकते. मॉडर्ना ही आरएनए आधारित लसीची मानवी चाचणी घेणारी पहिलीच औषध कंपनी आहे. वर्षअखेरीस कोरोना प्रतिबंधक लस येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्हटले होते.

mRNA-1273 असे या लसीचे नाव आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे की mRNA-1273 च्या क्लिनिकल ट्रायलमध्ये प्राथमिक चाचणीत अनेक लोकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. ज्यात 8 रुग्णांच्या शरीरात चाचणीदरम्यान कोरोनाला रोखणारी अँटीबॉडी तयार झाल्या ज्याचे प्रमाण हे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीएवढेच किंवा त्यापेक्षा जास्त होता. ही अँटीबॉडी किंवा इम्यून रिस्पॉन्स कोरोनाला रोखू शकते, हे आम्ही सिद्ध केले असल्याचे मॉडर्ना कंपनीचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. ताल जक्स यांनी सांगितले. mRNA-1273 च्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या फेरीत झालेल्या चाचणीनंतरचा हा दावा आहे. कोणतीही लस तयार होण्यासाठी किमान सहा टप्पे पार करावे लागतात.

जानेवारी महिन्यापासून मॉडर्ना कंपनी या लसीवर संशोधन करत आहे. कंपनीने यासाठी आवश्यक जेनेटिक कोड मिळवल्यानंतर मानवी चाचणी करण्याचा कालावधी फारच कमी दिवसात पूर्ण केला. या मानवी चाचणीसाठी ज्या 45 जणांवर परीक्षण करण्यात आले होते, त्यांना औषधाची मात्रा देण्यात आली. या औषधाद्वारे कोरोनाविरुद्ध लढण्याची त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली दिसली. त्याच आधारावर या लसीचा मनुष्यावरील वापर सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment