जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; …तर ही महामारी अजून रुद्ररुप धारण करेल


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनामुळे जगात निर्माण झालेली भयावह परिस्थिती अद्यापही आटोक्यात आलेली नसतानाच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला आहे. आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी जर सर्वच देशांनी घेतली नाही, तर ही महामारी अजूनच रुद्ररुप धारण करेल अशी अशी भीती व्यक्त करत एकप्रकारे इशाराच दिला आहे. त्याचबरोबर चुकीच्या दिशेने अनेक देश वाटचाल करत असल्याचे मला स्पष्ट करायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अद्यापही लोकांचा कोरोना संसर्ग पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचे टेड्रोस यांनी म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य जिनिव्ही येथे कोरोनासंबंधी बोलताना केले आहे. मुलभूत नियमांचे जर पालन केले नाही तर महामारी गंभीर, गंभीर आणि अतीगंभीर रुप धारण करेल, असे टेड्रोस यांनी म्हटले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जगभरात सध्या १ कोटी ३२ लाख लोक कोरोनाबाधित आहेत. तर साडे पाच लाखांच्या पुढे मृतांची संख्या गेली आहे. टेड्रोस यांनी यावेळी रविवारी २ लाख ३० हजार नवे रुग्ण मिळाले असून यामधील ८० टक्के रुग्ण १० देशांमधील असून फक्त दोन देशांमध्ये ५० टक्के रुग्ण सापडल्याचे सांगितले. कोरोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिका आणि ब्राझिलला या दोन देशांना बसला आहे.

अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल. जागतिक आरोग्य संघटनेने शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असे सांगताना शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असे आवाहनही केले आहे. दरम्यान अमेरिकेकडून अद्यापही आपण जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडल्याचे अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे टेड्रोस यांनी यावेळी सांगितले आहे.

Leave a Comment