तैवानने दलाई लामांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे चीनला झोंबणार मिरच्या


ताईपे – गेल्या काही दिवसांपासून चीन आणि तैवान या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे अनेकदा तैवानला चीनने युद्धाचीही धमकी दिली आहे. या तणावादरम्यानच चीनच्या वर्मावर तैवानने घाव घातला आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्याबाबत तैवानने एक मोठे वक्तव्य केले आहे. दलाई लामांना तैवानमध्ये यायचे असेल तर त्यांचे स्वागतच असेल, असे तैवानने म्हटल्यामुळे चीनला आता मिरच्या झोंबण्याची शक्यता आहे.

जर विनंती दलाई लामा यांनी केली तर त्यांच्या भेटीबाबत नियमानुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आमचा देश बौद्ध शिक्षणाच्या प्रसारासाठी पुन्हा एकदा दलाई लामा यांचे स्वागत करण्यासाठी तयार असल्याचे तैवानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जोआने ओयू यांनी म्हटले आहे. दलाई लामा यांनी २००९ मध्ये अखेरचा तैवान दौरा केला होता.

दलाई लामा यांनी तैवानमध्ये आपल्या वाढदिवसाच्या दिनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. दलाई लामा यांना चीन कायमच फुटीरतावादी नेता मानत आल्यामुळे चीनकडून त्यांच्या तैवान दौऱ्याचा विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीन तैवानला आपलाच भूभाग मानतो. तर दुसरीकडे तैवानने आपण लोकशाही आणि स्वतंत्र देश असल्याची घोषणाही केली आहे.

चीन आणि तैवानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा चीनची फायटर जेट तैवानच्या सीमाभागत घुसली होती. त्यानंतर तैवानने चीनला इशारा दिला होता. १० दिवसांमध्ये ५ वेळा तैवानच्या हवाई सीमेचे चीनच्या हवाई दलाने उल्लंघन केले होते. भाजप खासदार मिनाक्षी लेखी आणि कस्वान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग वेन यांच्या शपथविधीदरम्यान सहभागी झाले होते. चीनने यावरही आक्षेप घेतला होता.

चीन आणि भारतादरम्यान असलेल्या ताबा रेषेवर काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यानंतर एक फोटो व्हायरल होता. प्रभू श्रीराम यांनी चीनच्या ड्रॅगनला मारण्यासाठी हाती धनुष्य घेतल्याचं यात दाखवण्यात आले होते. हाँगकाँगची सोशल मीडिया साईट LIHKG ने हा फोटो शेअर केला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हा फोटो व्हायरल झाला होता.

Leave a Comment