लॉकडाऊनच्या काळात हिमेश रेशमियाने कंपोज केली ३०० गाणी


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. पण या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक क्षेत्रातील कामकाज ठप्प पडले होते. याला कलाविश्वदेखील अपवाद ठरले नाही. पण अनेक सेलिब्रिटींनी याकाळात घरी राहून त्यांचे छंद जोपासले. काहींनी चित्रकलेत आपले मन रमवले, तर कोणी बागकामात आपल्या झोकून दिले. पण या लॉकडाऊनच्या काळात बॉलीवूडची हिट मशीन अर्थात प्रसिद्ध गायक, संगीतकार हिमेश रेशमिया काम करत होता. त्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत आपण या लॉकडाऊनच्या काळात घरी राहून काही गाणी तयार केली असून लवकरच ही गाणी श्रोत्यांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे.

‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारा हिमेश रेशमिया आज लोकप्रिय संगीतकार म्हणून ओळखला जातो. या लॉकडाउनच्या काळात जवळपास ३०० नवीन गाणी हिमेशने तयार केली आहेत. ही गाणी लवकरच रिलीज करण्यात येणार आहेत. राजेश रोशन यांच्या एमएक्स प्लेअर टाइम्स ऑफ म्युझिक यांच्यासोबत हिमेशने करार केला आहे. त्याअंतर्गत हिमेश जवळपास ७०० गाणी तयार करत आहे.

या मुलाखती दरम्यान हिमेशला तू लॉकडाउनच्या काळात घरी राहून नेमके काय केले असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना, त्याने मी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. मला या प्रोजेक्टसाठी जवळपास ७०० गाणी कंपोज करायची आहेत. ज्यातील ३०० गाणी मी लॉकडाउनच्या काळात घरी राहून पूर्ण केली आहेत. या नव्या प्रोजेक्टमुळे मला वेगवेगळ्या पद्धतीने गाणी कंपोज करण्याची प्रेरणा मिळाली. या नव्या प्रोजेक्टची लवकरच मी घोषणा करणार आहे. कारण माझ्यामते, या प्रोजेक्टमुळे संगीत क्षेत्रातील कलाकारांना नवीन काही तरी पाहायला मिळणार आहे. यात अनेकविध गाण्यांचा समावेश असल्याचे हिमेशने सांगितले.

दरम्यान, सध्याच्या काळात तरुणाईमध्ये रिमिक्सची असलेली क्रेझ कमी झाली आहे. म्हणून आता मला वाटते आपण खूप रिमिक्स गाणी ऐकली. पण आता एखाद्या ओरिजनल गाण्यांवर काम करुया, त्यामुळे तुम्ही मला लवकरच नव्या गाण्यासह पाहू शकणार असल्याचे तो म्हणाला.

Leave a Comment