ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत बाजारात दाखल होऊ शकते रशियाची बहुचर्चित लस


मॉस्‍को – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा बिमोड करण्यासाठी सर्वच देशातील संशोधक अहोरात्र मेहनत करत आहेत. पण यात आता रशियाने बाजी मारली आहे. कारण कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने केला होता. यासंदर्भात माहिती देताना विद्यापीठाने म्हटले आहे, की या लसीची सर्वप्रकारची चाचणी व परीक्षण ३८ स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या पार पडले असून कोरोनावरील जगातील ही पहिली प्रतिबंधक लस ठरेल, असा विद्यापीठाचा हा दावा आहे. त्याचबरोबर, रशियन सैन्यानेदेखील सरकारी गेमलेई राष्ट्रीय संशोधन केंद्रात दोन महिन्यांत समांतर चाचण्या पूर्ण केल्या. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत ही लस सर्वांसाठी उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गॅमलेई सेंटरचे प्रमुख अलेक्झांडर गिंटझबर्ग यांनी सरकारी वृत्तसंस्था ‘टास’शी बोलताना ही लस ‘सिव्हिल सर्कुलेशन’मध्ये १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान असेल अशी अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले. अलेक्झांडर यांच्या म्हणण्यानुसार या लसीचे सप्टेंबरपासून खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करणार आहेत.

गेमलई संशोधन केंद्राच्या प्रमुखांच्या मते मानवी चाचणीत ही लस पूर्णपणे सुरक्षित ठरली आहे. ही लस जेव्हा ऑगस्टमध्ये उपलब्ध केली जाईल, तेव्हा ती तिसऱ्या टप्प्यातील चाचणीप्रमाणे असेल. कारण ही लस ज्यांना दिली जाईल त्यांच्यावर देखरेख ठेवली जाणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लस किंवा औषधाची चाचणी केली जाते आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात त्यांची चाचणी होते. १८ जून रोजी या लसीची चाचणी सुरू करण्यात आली होती. सुरूवातीला ९ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आल्यानंतर ही लस आणखी ९ जणांना देण्यात आली. कोणत्याही स्वयंसेवकावर याचे दुष्परिणाम दिसले नाहीत. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

पुढील बुधवारी सेचेनोव्ह विद्यापीठातील स्वयंसेवकांच्या दोन ग्रुपना सुट्टी देण्यात येणार आहे. २३ जून रोजी त्यांना लस देण्यात आली होती. त्यांना सध्या २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यांसाठी १८ ते ६५ वर्षांदरम्यान वय असलेल्या या स्वयंसेवकांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार कोणत्याही लसीची अथवा औषधाची मोठ्य़ा प्रमाणात उत्पादन होण्यापूर्वी तीन टप्प्यांत चाचणी होणे आवश्यक आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment