श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रशासनात त्रावणकोर शाही परिवाराचे अधिकार कायम – सर्वोच्च न्यायालय


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज केरळच्या तिरुअनंतपूरम येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे प्रशासन आणि संपत्तीबद्दल मोठा निर्णय दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला असून त्रावणकोर शाही परिवाराचे श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रशासनात अधिकार कायम ठेवले आहेत. काही वर्षांपूर्वी श्री पद्मनाभ स्वामी मंदिर संपत्तीमुळे चर्चेत आले होते. श्री पद्मनाभ स्वामी मंदिर देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. दोन लाख कोटीची संपत्ती मंदिराजवळ असल्याचे बोलले जाते.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोरच्या शाही परिवाराकडे कायम राहणार आहे. तूर्तास मंदिराचे व्यवस्थापन तिरुअनंतपूरममधील जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यतेखालील समितीकडे राहणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

२०११ साली श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या संपत्तीवर राज्य सरकारचा अधिकार असल्याचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला होता. त्रावणकोरच्या शाही परिवाराने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात आठ वर्ष सुनावणी चालली. न्यायाधीश ललित आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने एप्रिल महिन्यात निकाल सुरक्षित ठेवला होता.

१८ व्या शतकात त्रावणकोरच्या शाही कुटुंबाने श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे पूननिर्माण केले होते. १९४७ च्या आधी या शाही कुटुंबाने दक्षिण केरळ आणि त्याला लागून असलेल्या तामिळनाडूच्या काही भागांवर शासन केले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन राजकुटुंबाचे नियंत्रण असलेल्या ट्रस्ट मार्फत सुरु होते.

Leave a Comment